आंतरराष्ट्रीय क्रिकेट डेब्यू साठी वयाची अट आयसीसी कडून जाहीर

क्रिकेटचा दर्जा उत्तम राहावा आणि खेळाडू सुरक्षा लक्षात घेऊन आयसीसीने आंतरराष्ट्रीय डेब्यू साठी खेळाडूच्या वयात बदल केल्याचे शुक्रवारी जाहीर केले असून तशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आजपर्यंत या संदर्भात कोणताही नियम नव्हता पण नवीन नियमानुसार मात्र १५ वर्षाखालील कोणताही क्रिकेट खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट डेब्यू या पुढे करू शकणार नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट डेब्यू संदर्भात माहिती घेतली तर असे दिसून येते की लहान वयात ही कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये ३ पाकिस्तानचे,१ बांगलादेशी आणि एक भारतीय खेळाडू सामील आहेत. यात पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा फलंदाज हसन राजा असून त्याने ९६ साली झिम्बावे विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला तेव्हा तो १४ वर्षे २३७ दिवस वयाचा होता. दुसरा खेळाडू पाकिस्तानचा मुश्ताक महमद याने १५ वर्षे १२४ दिवस वय असताना वेस्ट इंडीज विरुध्द डेब्यू केला होता.

तिसरा नंबर बांग्लादेशी मोहमद शरीफ या ऑल राउंडर खेळाडूचा असून त्याने झिम्बावे विरुद्ध पहिला सामना खेळाला तेव्हा तो १५ वर्षे १२८ दिवसांचा होता. या यादीत चार नंबरवर पाकिस्तानी अकीब जावेद हा असून त्याने १६ वर्षे १८९ दिवस वयात पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता.

या यादीत पहिल्या पाच नंबरात पाच नंबरवर भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचा समावेश आहे. त्याने १६ वर्षे २०५ दिवस वय असताना पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध  सहाव्या नंबरवर फलंदाजीला उतरून खेळला होता. त्यानंतर सचिन ने क्रिकेट मध्ये अनेक कीर्तिमान स्थापित केले आणि तो क्रिकेट सुपरस्टार बनला. त्याने ६०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ३४ हजाराहून जास्त धावा काढल्या आहेत.