अंबानीना मागे टाकत अदानींची संपत्ती कमाईत आघाडी

 

फोटो साभार इंडिया टुडे

अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात सर्वाधिक वाढ नोंदविली गेली असून या बाबतीत त्यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंत आणि देशातील बडे उद्योजक रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलीनेअरच्या इंडेक्स नुसार अदानी यांच्या संपत्तीत १९.१ अब्ज डॉलर्सनी वाढ झाली आहे तर मुकेश अंबानी यांची संपत्ती १६.४ अब्ज डॉलर्स ने वाढली आहे.

भारतीय रुपयात बोलायचे तर गौतम अदानी यांची संपत्ती साडे दहा महिन्यांच्या काळात १.४१ लाख कोटींनी वाढली आहे. याचा अर्थ ही वाढ प्रतिदिन ४४९ कोटी इतकी आहे. त्यांची एकूण संपत्ती आता ३०.४ अब्ज डॉलर्स झाली आहे आणि ते जगातील श्रीमंत यादीत ४० व्या स्थानावर आले आहेत.

रिलायंसच्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १६.४ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती ७५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून जागतिक धनकुबेर यादीत ते १० व्या स्थानावर आहेत. या वर्षी जगात सर्वाधिक वेगाने संपत्ती वाढण्याचे रेकॉर्ड टेस्लाचे एलन मस्क यांनी केले आहे. त्यांच्या संपत्तीत या वर्षात ९५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून त्यांची संपत्ती १२३ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. जागतिक धनकुबेर यादीत त्यांनी फेसबुकच्या झुकेरबर्ग ला मागे टाकून तीन नंबर वर झेप घेतली आहे. तर जगातील सर्वाधिक श्रीमंत अमेझॉनचे जेफ बेजोस यांची संपत्ती या वर्षात ६८ अब्ज डॉलर्सने वाढली आहे.