यावेळेस मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा नव्हेतर भाजपचा भगवा फडकेल – भातखळकर


मुंबई – मुंबई महापालिकेवर भाजप झेंडा फडकवेल, असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यानंतर, त्यावर शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला. त्याला आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर दिले आहे.

भगवा महापालिकेवरून उतरणार नाही, या सामनातील भावनेशी मी सहमत आहे. फरक एवढाच की यावेळी भाजपाचा भगवा फडकेल. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेले हिंदुहृदयसम्राट हे बिरुद सत्तेच्या सोयीसाठी नाकारणाऱ्या शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, २०२२ मध्ये त्याची सुरुवात होणार आहे, असे भातखळकर यांनी ट्विट केले आहे.


तर, मराठी अभिमान, स्वाभिमानाचे मुंबई महापालिका ही प्रतीक आहे. महानगर पालिकेवर जोपर्यंत भगवा आहे. तोपर्यंत मुंबईच्या गळय़ापर्यंत महाराष्ट्र दुश्मनांचे पाशवी हात पोहोचणार नाहीत. याच तेजस्वी भगव्याने मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम केले आहे. ज्यांनी मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाल्याचे म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधलेला आहे.

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही १०५ मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे, असेही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलेले आहे.