30 नोव्हेंबरपर्यंत भरा वाहतूक विभागाचा दंड; अन्यथा गाडी होईल जप्त


ठाणे : या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून जवळपास 22 कोटी रुपयांची चलान फाडली आहेत. त्यातही जवळपास 13 कोटी रुपयांची वसुली झाली नसून आता चालकांना दहा दिवसांची मुदत दंडाची प्रलंबित रक्कम भरण्यासाठी देण्यात आली आहे. दंड न भरल्यास 1 डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गाड्या ताब्यात घेण्यापासून ते गाडी परवाना निलंबनाचीही कारवाई करण्याची माहिती दिली. त्याचबरोबर पत्रिपूलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी चार दिवस घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाईचा आकडा मोठा असला तरी दंडाची रक्कम वसूल होत नाही. कारण, वाहन चालक दंडच भरत नाहीत. थकीत रकमेचा आकडा मोठा असल्याचे निदर्शनास आल्यामुळे दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत. प्रलंबित असलेल्या ई चलानची रक्कम येत्या दहा दिवसांमध्ये भरण्याची मुदत चालकांना देण्यात येत आहे. अन्यथा दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी 1 डिसेंबरनंतर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम प्रलंबित असलेल्या चालकांवर खटले दाखल करण्यात येतील. ही कारवाई करत असताना मोटार वाहन कायदा कलम 207 अन्वये गाडी ताब्यात घेतली जाऊ शकते. तसेच गाडी परवाना निलंबनाची कारवाई होईल. नागरिकांची या कारवाईमुळे गैरसोय होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी दंडाची थकीत रक्कम मुदतीत भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

ही दंडाची पोलिसांनी कोरोनामुळे रक्कम वसूल केली नाही. पण आता 10 दिवसांचे अल्टिमेटमच वाहतूक पोलिसांनी दिले आहे. आता वाहतूक पोलिसांकडून पेंडिंग ई-चलानची संपूर्ण वसुली करण्यात येणार आहे. तसेच सेवा रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.