सायबर हल्ल्यामुळे गेली मुंबईची वीज: सायबर सेलचा प्राथमिक अंदाज


मुंबई: गेल्या महिन्यात मुंबईतील वीज पुरवठा काही तासांसाठी खंडीत झाल्याची घटना सायबर हल्ल्यामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने व्यक्त केला आहे. या प्रकरणी चौकशी करून एक आठवड्यात राज्य शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.

प्राथमिक तपासात ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील लोड डिस्पॅच सेंटर येथे सायबर विभागाला ‘मालवेअर’ आढळून आले आहे. सेंटरमधून मुंबई शहर, ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबईच्या इतर भागात व्यापणार्‍या विविध भागात लोड पाठवण्याचे व्यवस्थापन करते.

हे सेंटर स्वयंचलित यंत्रणेद्वारे चालविले जाते. या यंत्रणेवर सायबर हल्ला केला जाऊ शकतो. हा प्राथमिक निष्कर्ष आहे, असे महाराष्ट्र सायबर विभागातील सूत्रांनी सांगितले. वीज खंडीत होण्यामागे यंत्रणेतील बिघाड अथवा तोडफोड कारणीभूत असल्याचा संशय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ऑकटोबर महिन्यात दि. १३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुमारे १० ते १२ तास मुंबई परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. शासकीय रुग्णालयांमध्ये बॅक-अप वरच अतिदक्षता विभाग सुरू होते. कोविड केंद्रही बॅक-अप वर चालू होती. पडघा तेथील सेंटरमध्ये ट्रिपिंग कझाल्यामुळे वीज खंडीत झाल्याचे जात होते.

यावर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढत असतानाच चीनमधील हॅकर्सनी भारतीय सायबर स्पेसवर हल्ला केला असल्याची माहिती सायबर विभागाने दिली आहे. यावर्षी जूनमध्ये देशातील माहिती, बँकिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात चार ते पाच दिवसांच्या कालावधीत हजारो सायबर हल्ले झाले. महाराष्ट्र सायबर विभागाने सखोल विश्लेषण आणि तपासणीअंती हे सर्व हल्ले चीनकडून करण्यात आले होते असे नमूद केले आहे.