नितीन नांदगावकरांच्या विनंतीनंतर ‘कराची स्वीट्स’मधील गायब झाले ‘कराची’


मुंबई – शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी केली होती. नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्स या नावातील कराची या शब्दावर आक्षेप घेतला असून हे नाव १५ दिवसांच्या आत बदलण्यात यावे किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाकावा अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली. तसेच, त्यांनी मुंबईतील कराची बेकरीच्या सगळ्याच आऊटलेट्सना धमकीवजा इशारा दिला. शुक्रवारी सकाळी ग्राहकांना या इशाऱ्यानंतर कराची स्वीट्सच्या दुकानावर एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. हे नाव शिवसेना नेत्याच्या इशाऱ्यानंतर वृत्तपत्राच्या पानांनी झाकून टाकण्यात आले आहे.

संपूर्ण देशात पसरलेली कराची स्वीट्स फूड चेन आहे. कराची स्वीट्सची उत्पादने विकणारे साधारणपणे प्रमुख शहरे आणि महानगरे यामध्ये अनेक आऊटलेट्स आहेत. कराची बेकरीचे मुंबईतही अनेक ठिकाणी आऊटलेट्स आहेत. नितीन नांदगावकर यांनी या बेकरीच्या नावातील कराची या शब्दावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी मुंबईतील सर्व कराची बेकरीच्या आऊटलेट्सना इशारादेखील दिला आहे. कराची बेकरीचे नाव बदलून मालकांनी स्वत:च नाव किंवा दुसरे कोणतेही नाव ठेवावे, पण नावातून कराची हा शब्द काढून टाकावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर तात्पुरता उपाय म्हणून कराची स्वीट्स व्यवस्थापनाने मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या आपल्या दुकानाच्या नावावर थेट वृत्तपत्राचे कागद चिकटवून नाव झाकून टाकले.

दरम्यान, शिवसेनेत मात्र या मुद्द्यावर दुमत असल्याचे दिसून आले आहे. नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोध केला आहे. आता अशा प्रकारची मागणी करण्यात काहीच अर्थ नाही. नितीन नांदगावकर यांची भूमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केल्यामुळे या मुद्यावर शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचे उघड आहे.