भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्साह


मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांच्या मालिकेबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. एकूण ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांची तिकिटे केवळ २४ तासात संपली आहेत. एका सामन्याची केवळ २ हजार तिकिटे शिल्लक आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २ नोव्हेंबरपासून एकदिवसीय आणि टी-२० मालिका सुरू होत आहे. कोविड १९ च्या महासाथीमुळे जगभरातील क्रिकेट ११७ दिवस ठप्प होते. हा खंड संपवून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यापासून प्रथमच भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर येणार आहेत. प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊन खेळाचा आनंद घेऊ शकतील अशी ही पहिलीच मालिका असणार आहे.

यापूर्वी इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्याबरोबर सामने खेळले आहेत. मात्र, त्यामध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला नाही. हे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्येही दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथील स्टेडियमच्या आत चाहत्यांना प्रवेश दिला गेला नाही. ऑस्ट्रेलियामध्ये करोनाग्रस्तांची संख्या तुलनेने कमी असल्याने निर्बंध कमी करण्याच्या योजनांचा एक भाग म्हणून येथील स्टेडियममध्ये मर्यादित क्षमतेत चाहत्यांना खेळाचा आनंद लुटता येणार आहे.