कोरोनाबाधितांच्या आकड्यात होत असलेल्या वाढीमुळे गुजरातमधील ‘या’ शहरात कर्फ्यू लागू


अहमदाबाद – मागील आठ महिन्यापासून देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून याचदरम्यान देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे या संकटाने बाधित होणाऱ्यांच्या संख्येला आळा बसला होता, पण देशात अनलॉकच्या माध्यमातून अटी शिथील केल्यानंतर देशातील मोठ्या शहरांत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात गुजरातच्या अहमदाबाद शहरात देखील झपाट्याने वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून अखेर शहरात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आज (शुक्रवार) रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत गुजरातमधील व्यापाऱ्याच्या दृष्टीने गजबजलेले शहर म्हणून ओळख असणाऱ्या अहमदाबादमध्ये कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ दूधविक्री केंद्र आणि मेडिकल दुकाने संचारबंदीच्या काळात उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. संचारबंदी सोमवारनंतरही रात्रीच्या काळात कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अहमदाबाद शहरातील कोविड परिस्थितीसंबंधीची जबाबदारी वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव राजीव कुमार गुप्ता यांच्यावर आहे. शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता त्यांनी रात्रीच्या काळात संचारबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही वेळातच शुक्रवार रात्र ते सोमवारी सकाळ संपूर्ण संचारबंदीचाही निर्णय जाहीर करण्यात आले.

त्याचबरोबर शहरातील शाळा खुल्या करण्याच्या निर्णयावरही स्थगिती देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश गुजरात सरकारने दिले होते. पण तो आदेश आता मागे घेण्यात आला आहे. शाळा उघडण्याचा निर्णय तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. याबाबत लवकरच विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंग यांनी दिली.