भारताला मित्रराष्ट्रांपासून तोडण्याचा चीनचा डाव: अमेरिका


नवी दिल्ली: चीन भारताला आपला प्रतिस्पर्धी समजत असून भारतावर कुरघोडी करण्यासाठी मित्रराष्ट्रांपासून भारताला तोडण्याचा चीनचा डाव आहे, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात चीनच्या विस्तारवादी भूमिकेचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. अनेक देशांचे आर्थिक, सामरिक हितसंबंध आणि सार्वभौमत्व याला चीनकडून धोका असून चीनच्या मस्तवाल भूमिकेबद्दल जगभरात नाराजी व्यक्त होत आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चीन भारताकडे कडवा प्रतिस्पर्धी म्हणून पहात आहे. जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या महत्वाला खीळ घालण्यासाठी चीन प्रयत्न करीत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अन्य लोकशाही देशांबरोबर असलेले भारताचे राजनैतिक, सामरिक आणि आर्थिक संबंध बिघडविण्याचा चीनचा डाव आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने भारताला दिलेल्या चिथावणीचा उल्लेख करून दोन देशांमधील तणावाबद्दल अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

चिनी परराष्ट्र विभागाने हा अहवाल फेटाळून लावला आहे. जगाने विस्मृतीच्या ढिगाऱ्यात लोटलेल्या शीतयुद्धाच्या आठवणी जागविणारा हा अहवाल आहे, असे चीनने म्हटले आहे.