मुंबईच्या महापौर म्हणतात, धार्मिकस्थळे उघडल्यामुळेच कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाची भीती पुन्हा एकदा वाढताना दिसत असून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत असून, धार्मिकस्थळे सुरू केल्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी केला आहे. राज्यातील धार्मिकस्थळे दिवाळीत उघडल्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे महापौर पेडणेकर यांनी म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आलेली नाही. पण ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट असून तो अद्याप संपलेला नसल्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

दिवाळीमुळे गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आता त्याची प्रचिती येताना दिसत असून, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले. दिवाळीमध्ये राज्यातील धार्मिकस्थळे उघडल्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

लोकल ट्रेन आणि शाळा सुरु करण्याबाबत अद्यापही सबुरी बाळगली पाहिजे. शाळा सुरु झाल्या की राज्य सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या मोहिमेत खंड पडेल. पालक सोशल मीडियावरही शाळा उघडू नका, हेच म्हणत असल्यामुळे मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट मुंबईत अद्याप आलेली नाही. पण ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अद्याप संपलेला नसल्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, अशी भीती महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केली.

मुंबईतील लोकल ट्रेन सुरु झाल्यास कोरोना प्रादुर्भाव सर्वदूर होण्याचा धोका आहे. ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे तुर्तास रेल्वे सुरु होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. या सगळ्यावरून एक-दोन टक्के लोक उगीचच कांगावा करत आहेत. त्यांना बोलू द्या, आम्हाला फरक पडत नाही. आमच्यासाठी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. बाकी सगळे नंतर पाहू, अशी भूमिका मांडत किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.