अॅपल इंकची चालूगिरी, भरावा लागणार भक्कम दंड

फोटो साभार मिडीयम

आयफोन निर्माती कंपनी अॅपल पुन्हा एकदा विवादात सापडल्याने चर्चेत आली आहे. एका चुकीसाठी कंपनीला भक्कम दंड भरावा लागण्याची पाळी आली आहे. अॅपलने दंड भरण्याची तयारी दाखविली आहे मात्र चूक कबुल करण्यास नकार दिला आहे असेही समजते. अॅपल विरुध्द अमेरिकेतील ३४ राज्ये चौकशी करत आहेत आणि कंपनीला ११३ मिलियन डॉलर्स म्हणजे ८ अब्ज ४० कोटी रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वीही अॅपलला ५०० मिलियन डॉलर्सची पेनल्टी द्यावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अॅपलने युजर्सना कोणतीही कल्पना न देता एक अपडेट जारी केला होता. यामुळे जुने आयफोन स्लो म्हणजे मंद गती झाले आहेत. जेव्हा युजर्सना अपडेट जारी केल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी न्यायालयात धाव घेऊन कंपनी विरुध्द तक्रार दिली असून त्यात कंपनीने नव्या फोनची खरेदी युजर्सनी करावी यासाठी मुद्दामच हे अपडेट जारी केल्याचा आरोप केला आहे. कंपनीने हा दावा फेटाळला असला तरी अमेरिकेतील न्यायालयाने अॅपलने या अपडेटचा फटाका बसलेल्या सर्व युजर्सना प्रत्येकी २५ डॉलर्स द्यावे असे आदेश दिले आहेत. आयफोन ६, ६ एस, ६ प्लस, आयफोन ७, ७ प्लस, एसईचे युजर्स या अपडेट मुळे अधिक प्रभावित झाले आहेत असेही समजते.

दरम्यान अॅपलने या संदर्भात खुलासा करताना जुनी बॅटरी शटडाऊन होऊ नये किंवा अन्य अडचण येऊ नये म्हणून मुद्दाम हे अपडेट जारी केल्याचे म्हटले आहे आणि चूक कबुल करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर कंपनीने पुन्हा एक अपडेट जारी केले असून त्यात बॅटरी संबंधित एक फिचर आहे. त्यामुळे युजर्स बॅटरीची क्षमता स्वतः तपासू शकणार आहेत.