या सूर्यमंदिरात सूर्य मातेने केले होते छट पूजा व्रत

फोटो साभार विकिपीडिया

बिहार मध्ये सध्या छट पूजेचा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा होत असून सर्व मंदिरे, नदीकाठ, सरोवरे गर्दीने फुलली आहेत. बिहारच्या औरंगाबाद पासून जवळ असलेल्या देव सूर्यमंदिराचे एक वेगळे महत्व असून येथे छट पूजा करणाऱ्या भाविकांच्या सर्व इच्छा मनोरथ पूर्ण होतात असे मानले जाते. या काळात येथे मोठी जत्रा भरते. असा विश्वास आहे की येथे सूर्याच्या मातेने छट पूजा केली होती. देशातील हे एकमेव असे सूर्य मंदिर आहे ज्याचे प्रवेशद्वार पूर्वेकडे नसून पश्चिमेकडे आहे.

या मंदिराच्या गर्भगृहात तीन प्रतिमा असून काही जण त्या ब्रह्मा विष्णू महेशाच्या आहेत असे मानतात तर अन्य मात्र या प्रतिमा सुर्याच्याच असून त्यात उगवतीचा सूर्य, मध्यान सूर्य आणि मावळतीचा सूर्य प्रतिमा आहेत असे मानतात. गर्भगृहाबाहेर मुख्य द्वारावर एक सूर्यप्रतिमा असून उजवीकडे महादेव प्रतिमा आहे.

हे मंदिर अतिप्राचीन असून ते ८ व्या शतकातील असल्याचे समजते. मात्र येथे हे मंदिर देवांचा वास्तूविशारद विश्वकर्मा याने ५ हजार वर्षापूर्वी बांधले असेही सांगितले जाते. याची कथा अशी सांगतात की जेव्हा सूर आणि असुर म्हणजे देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरु झाले तेव्हा देव विजयी व्हावेत म्हणून देवांची माता अदिती हिने येथे घोर तपस्या केली. त्यावेळी तिने असुरांचा संहार करायला तेजस्वी पुत्र मिळावा म्हणून उपासना केली होती. तेव्हा प्रसन्न झालेल्या छट मातेने अदितीला तसा वर दिला. त्यानंतर स्वतः सूर्यदेव अदितीच्या पोटी जन्माला आले आणि त्यावरून त्यांना आदित्य नाव मिळाले. त्यांनी असुरांचा नाश केला.

हे मंदिर १०० फुट उंच असून बांधकामात कुठेही सिमेंट किंवा चुना वापरला गेलेला नाही. या मंदिराचा कळस सोन्याचा असून तो चोरी करायचा प्रयत्न करणारा कळसाला चिकटून बसतो असे सांगितले जाते. येथेच सूर्यकुंड तलाव आहे. यात स्नान करणाऱ्याचे त्वचा रोग बरे होतात असा भाविकांचा विश्वास आहे.