या क्रिकेटर्सना नवजात अपत्य पाहण्यासाठी करावी लागली होती दीर्घ प्रतीक्षा

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली अपत्य जन्मासंदर्भात खरोखरच लकी म्हणावा लागेल. त्याची पत्नी अनुष्का लवकरच आई बनणार आहे आणि विराटने सुद्धा तिच्यासोबत राहण्यासाठी पॅटर्निटी लीव घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक कसोटी खेळून तो भारतात पुन्हा परतणार आहे. विशेष म्हणजे भारतासाठी खेळलेल्या अनेक महान क्रिकेटपटूना मात्र स्वतःच्या पहिल्या अपत्याचे दर्शन घडण्यासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली होती. आणि त्यात सुनील गावस्कर, सौरव गांगुली व माही धोनी यांचा समावेश आहे.

सुनील गावस्कर १९७६ मध्ये न्यूझीलंडमध्ये कसोटी सामने खेळत होता तेव्हा त्याचा मुलगा रोहन याचा जन्म झाला होता. सुनीलने घरी जाण्याची परवानगी बीसीसीआय कडे मागितली होती पण त्याला परवानगी मिळाली नाहीच पण उलट वेस्ट इंडीज दौऱ्यावर जावे लागले. त्याचा सहकारी खेळाडू अंशुमन गायकवाड एका मुलाखतीत सांगतो, वेस्ट इंडीजचे बोलर सतत बाउंसर टाकत होते. सुनीलने अंपायरकडे तक्रार केली पण उपयोग झाला नाही. शेवटी वैतागाने सुनील म्हणाला, मला येथे मरायचे नाही, घरी परत जायचे आहे आणि माझ्या मुलाला पाहायचे आहे. शेवटी रोहन अडीच महिन्याचा झाला तेव्हा सुनील त्याला प्रथम पाहू शकला होता.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली त्याची मुलगी सना २०११ मध्ये जन्मली तेव्हा द.आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. त्याची पत्नी डोना सांगते, सौरवला मुलगी झाल्याची बातमी तिच्याअगोदर समजली होती कारण डोना मुलीच्या जन्मानंतर बराच काळ शुद्धीवर आली नव्हती. पण मुलीचे दर्शन घ्यायला मात्र सौरव लगेच येऊ शकला नव्हता.

माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत असे घडले की जेव्हा २०१५ मध्ये जीवा जन्माला आली तेव्हा धोनी वर्ल्ड कपची तयारी करत होता आणि टीम ऑस्ट्रेलिया मध्ये होती. धोनीशी संपर्क होत नसल्याने साक्षीने मुलगी झाल्याचा टेक्स्ट मेसेज सुरेश रैना याला केला होता आणि रैनाने ही बातमी धोनीला दिली होती. पण त्यावेळी धोनी म्हणाला, सध्या मी राष्ट्रीय कार्य करतो आहे त्यामुळे बाकी सर्व गोष्टीना आत्ता वेळ नाही. मुलीला पाहण्यासाठी वाट बघावीच लागणार.