म्हणून भारतात कामगार महिला खातात तंबाखू

पान मसाला, गुटखा, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी धोका निर्माण करते हे सतत जनमानसावर बिंबविण्याचे प्रयत्न सरकार, सामाजिक संस्था, आरोग्य विभाग करत असतात तरीही तंबाखू व तत्सम पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते आणि त्यात पुरुष आघाडीवर असतात असे मानले जाते. मात्र नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात अति कष्टाची कामे करणाऱ्या सुमारे सात कोटी महिला तंबाखूचे सेवन करतात. पण त्या तंबाखू आवड म्हणून, व्यसन म्हणून खात नाहीत तर काम करताना लागणारी भूक दबविण्यासाठी खातात असा खुलासा झाला आहे.

आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना, पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांनी एकत्रितपणे हे सर्व्हेक्षण केले आहे. त्यात असे दिसून आले की भारतात दरवर्षी ३४ हजार महिलांची तंबाखू खाणाऱ्या वर्गात भर पडते आहे. पुरुषांबाबत ही संख्या ८५ हजार आहे. गुटखा, पान मसाल्याचा माध्यमातून तंबाखू सेवन करणाऱ्याची संख्या अधिक आहे.

२००९-१० मध्येही असेच एक सर्व्हेक्षण केले गेले होते. त्यानुसार १५ वर्षे व त्यावरच्या वयाच्या महिला तंबाखू सेवन अधिक प्रमाणात करतात. पण मजा म्हणून त्या तंबाखू खात नाहीत तर कष्टाचे काम करताना भूक लागते ती दाबून टाकण्यासाठी वारंवार तंबाखू खातात. श्रमिक महिलात हे प्रमाण अधिक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही