असा आहे टीम इंडियाचा इंग्लंड दौरा


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच खेळांची मैदाने ओस पडली. कोरोनामुळे अनेक स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेने सुरुवात झाली. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. अशातच ऑस्ट्रेलिया दौरा आटपून भारतात परतल्यानंतर भारतीय संघ दोन महिन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा काल इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने केली. भारतासोबतच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा संघ श्रीलंका आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावरही जाणार आहे.

चार ऑगस्ट रोजी ट्रेंट ब्रिजमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट रोजी लॉर्ड्समध्ये, तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत हेडिंग्लेमध्ये, चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत ओवलमध्ये, तर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 10 ते 14 सप्टेंबरपर्यंत ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळवण्यात येणार आहे.

गेल्यावेळी जेव्हा भारताने कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यात 1-4 असा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये एका कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाचा पाहुणचार करणार आहे. असे सांगण्यात येत आहे की, भारतीय मैदानावर इंग्लंडचा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या संघासोबत 29 जून ते चार जुलैपर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड पाकिस्तानसोबत 10 ते 13 जुलैपर्यंत तीन एकदिवसीय आणि 16 ते 20 जुलैपर्यंत तीन टी-20 सामने खेळणार आहे.

असा आहे भारतीय संघाचा इंग्लंड दौरा :
4 ते 8 ऑगस्ट – पहिली कसोटी, ट्रेंट ब्रिज
12 ते 16 ऑगस्ट – दुसरी कसोटी, लॉर्ड्स
25 ते 29 ऑगस्ट – तिसरी कसोटी, इमेराल्ड हेडिंग्ले
2 ते 6 सप्टेंबर – चौथी कसोटी, किया ओव्हल
10 ते 14 सप्टेंबर- पाचवी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड