‘बॉलिवूड’च्या मिथकामुळे झाकोळते प्रादेशिक कलाकारांची गुणवत्ता: नवाजुद्दीन


चित्रपट क्षेत्राचा सूर्य बॉलिवूडमध्येच उगवतो आणि बॉलिवूडमध्येच मावळतो, असे मिथक हेतुपूर्वक पसरविण्यात आले आहे. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटांमधील कलाकारांची गुणवत्ता झाकोळली जात आहे, असे मत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा गुणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने व्यक्त केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने प्रादेशिक चित्रपटक्षेत्र आणि बॉलिवूडबद्दल आपली मते मोकळेपणाने व्यक्त केली. लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी भरपूर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट बघितले. त्यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या गुणवत्तेची जाणीव मला झाली आणि अभिनयाच्या क्षेत्रात आपल्याला करण्यासारखे अजून बरेच बाकी आहे याची जाणीव झाली, असे नवाजुद्दीनने सांगितले.

चित्रपटक्षेत्राशी संबंधित गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी बॉलिवूडमध्ये, व्यावसायिक चित्रपटांकडेच यावे लागते, असा समाज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर काम करणाऱ्या गुणी कलावंतांवर अन्याय होत असल्याचे निरीक्षण त्याने नोंदविले. सौमित्र चटर्जी किंवा कमला हसन यांच्यासारख्या कलाकारांचे काम बघितल्यावर मला आपल्या खुजेपणाची जाणीव झाली. अभिनयात साध्य करण्यासारखे अजून खुलं शिल्लक आहे आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची गरज आहे याची जाणीव झाली, असेही तो म्हणाला.

सौमित्र चटर्जी अनेकदा कमीतकमी शब्दात आणि संयत हावभावात जे काही व्यक्त करून दाखवत ते थक्क करणारे आहे. ते किंवा कमल हसन यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेत त्यांच्या अभिनयाचे वजन दिसते. ते भूमिका साकारताना स्वतःचे अस्तित्व विसरून जातात. मलाही अभिनयाची ती उंची गाठायची आहे, असेही नवाजुद्दीनने नमूद केले.