कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पुणे पालिका प्रशासन सज्ज


पुणे : पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवाळीनंतर वाढ होत असल्यामुळे पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगर पालिकेने संभाव्य दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात लक्षणे जाणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वेळेत तपासणी करण्यासाठी ‘अँटिजेन टेस्ट’ला प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिकेने त्यासाठी नव्याने 50 हजार किट मागवले आहेत. तसेच, ‘स्वॅब कलेक्‍शन सेंटर’ आणि ‘आरटीपीसीआर’चेही प्रमाण वाढविण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रोज अडीच हजार नवे रुग्ण या टप्प्यात सापडण्याची भीती आहे. एवढ्या रुग्णांना मोफत आणि वेळेत उपचार देण्यासाठी महापालिकेने अडीच हजार बेडचीही व्यवस्था केली आहे.

परंतु महापालिकेने उपचाराआधी तपासण्यांचेही प्रमाण वाढविण्याचे नियोजन केले आहेत. त्यातून रोजच्या तपासणीचे प्रमाण दीड हजारांवरुन पुन्हा सहा हजारांपेक्षा अधिक करण्यात येणार आहेत. त्यात ‘आरटीपीआर टेस्ट’ सर्वाधिक असल्या तरी ‘अँटिजेन’चेही प्रमाण वाढवले जाणार आहे. त्यासाठी 50 हजार किट मागवण्यात आले आहेत. या किटच्या माध्यमातून रोज दीड हजार नागरिकांची तपासणी करता येणार आहे.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवाळीनंतर वाढली आहे. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: 14 टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, दिवसभरात 2 हजार 743 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 384 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. 10 टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता 13 टक्क्यांच्या आसपास पोहोचल्यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.