ममता बँनर्जींचा भाजपवर बंगालमधील शांतता भंग करण्याचा आरोप


कोलकाता – लवकरच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. दरम्यान, सर्वच पक्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच तयारीला लागले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असल्याचेही पाहायला मिळाले होते. राज्यपालांनी कोणत्याही प्रकारची राजकीय हिंसा सहन केली जाणार नसल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे भाजपवर निशाणा साधत निवडणुकीपूर्वी बाहेरच्या गुंडांना आणले जात असून त्यांच्याकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह कुच बिहार जिल्ह्यात सापडल्याची घटना घडल्यानंतर अशा घटनांवरून राज्यपालांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. राजकारणापासून कायदा आणि सुव्यवस्थेला वेगळे ठेवले गेले पाहिजे, राज्य सरकारला हे मी कायमच सांगत आलो आहे. काही अधिकारी असे आहेत, जे खरच असे करत आहेत. राजकीय हिंसाचार आपल्याला थांबवायला हवा, असे राज्यपाल म्हणाले होते.

कोणत्याही हिंसाचाराशिवाय आणि निष्पक्ष निवडणुका राज्यात पार पडाव्या यासाठी मी माझ्या अधिकारांचा वापर करून सर्वकाही करेन. निवडणुकांच्या निकालाशी मला काही घेणे देणे नाही. परंतु कायदा-सुव्यवस्था आणि मतदारांचे समाधान महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले होते.

तर दुसरीकडे भाजपवर ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोत केला. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी बाहेरील गुंड आणून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणी इतर काही स्तर ओलांडू नये. जनतेसोबत मी आहे. त्यांनी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. कोणीही तुमच्यावर हल्ला करू नये याची काळजी घेण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगाल घाबरणारे राज्य नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.