जागतिक पुरूष दिनानिमित्त केलेल्या ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला


मुंबई – आज जगभरात जागतिक पुरूष दिवस साजरा केला जात असून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुरूष दिनाचे निमित्त साधत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता यांनी राऊत यांना नामोल्लेख टाळत नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा, असे आव्हान करत टोला लगावला आहे.

राजकारणापासून जरी अमृता फडणवीस अलिप्त असल्या तरी त्या राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर भूमिका मांडतात. त्या अनेक वेळा चर्चेतही आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी जागतिक पुरूष दिनाचे निमित्त साधत ट्विट केले आहे.


आज जागतिक पुरूष दिवस आणि त्याचबरोबर जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.