शाहरुख गौरीच्या बंगल्यात दोन रात्री मुक्कामाची संधी

फोटो साभार फ्लिपबोर्ड

बॉलीवूड शेहनशाह शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या अलिशान बंगल्यात एखादा दिवस राहण्याची संधी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची संधी शाहरुख चाहत्यांना मिळू शकणार आहे. गौरी खान हिने व्हेलेंटाईन २०२१ च्या निमित्ताने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्थात त्यासाठी एक स्पर्धा घेतली जाणार आहे. त्या स्पर्धेत विजयी होणारा शाहरुखच्या दक्षिण दिल्ली येथील अलिशान बंगल्यात दोन दिवस मुक्काम करू शकणार आहे.

गल्फ न्यूजने दिलेल्या बातमीनुसार गौरीने कमी भाड्यात प्रवाशांना राहण्यासाठी घरे पुरविणाऱ्या एअरबीएनबी चे सहाय्य यासाठी घेतले आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत स्पर्धकांना ३० नोव्हेंबर पर्यंत ‘ ओपन आर्म वेलकम’ म्हणजे साध्या मराठीत मोकळ्या हृदयाने स्वागत याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे हे सांगायचे आहे. जो ही संकल्पना योग्य प्रकारे स्पष्ट करेल त्याला १३ व १४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी दिल्लीच्या शाहरुख बंगल्यात राहण्याची संधी मिळणार आहे.

या अलिशान बंगल्याची अंतर्गत सजावट गौरीनेच केली आहे. ती म्हणते हे घर आमच्या, कुटुंबाच्या ३० वर्षांच्या सहप्रवासाचे साक्षीदार आहे. या घरात आमच्या अनेक रम्य आठवणी आहेत आणि गौरीने त्या घराच्या भिंतींवर शेअर केल्या आहेत.