या देशांंत करोनाला नो एन्ट्री

फोटो साभार नो गुड

जगभरात १ वर्षात करोना कोविड १९ विषाणूने ऐसपैस हातपाय पसरून कोट्यवधी जनतेला आपल्या विळख्यात घेतले आहे. अनेक देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. करोना किती देशात फैलावला याच्या आकडेवारी वेळोवेळी जाहीर होत आहेत पण विशेष म्हणजे पृथ्वीवर काही देश असेही आहेत जेथे कारोनाला शिरकाव करता आलेला नाही. या यादीत उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान यांचीही नावे असली तरी जागतिक तज्ञ मात्र त्याबाबत प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

जॉन हाफकीन युनिव्हर्सिटीने सादर केलेल्या आकडेवारीचा आधार घेऊन बनविलेल्या या यादीतील देशात १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत तरी एकही करोना संक्रमित सापडलेला नाही. विशेषत: पर्यटन हाच ज्या बेटाचा प्राण आहे अश्या उत्तर प्रशांत महासागरातील पलाउ बेटावर करोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही. या आयलंडची लोकसंख्या १८ हजार आहे आणि २०१९ मध्ये येथे ९० हजार पर्यटक म्हणजे लोकसंख्येच्या पाचपट पर्यटक आले होते. मात्र येथील प्रशासनाने मार्च २०२० मध्येच बेटाच्या सीमा सील केल्या आणि करोनाचा शिरकाव होऊ दिला नाही.

याचबरोबर समोआ, किरीबाती, टोंगा, मायक्रोनेशिया, वानूआतु, तुवालू यांचाही या यादीत समावेश आहे. येथील लोकसंख्या कमी आहेच पण सुरवातीपासूनच येथील प्रशासनाने करोना येऊ नये म्हणून प्रवास बंदी लागू केली होती. ही सर्व पर्यटनस्थळे म्हणून जगात प्रसिध्द आणि लोकप्रिय आहेत त्यामुळे प्रवास बंदी ह अवघड निर्णय होता. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरी त्यांनी करोना पासून संरक्षण करण्यात यश मिळविले आहे.