तुर्कमेनिस्तान येथे राष्ट्रपतीच्या आवडत्या कुत्र्याचा सोन्याचा विशाल पुतळा

फोटो साभार नई दुनिया

देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आणि देशातील बहुसंख्य जनता गरिबीत जीवन जगत असताना तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरबांगुली बेर्डेमुखमेदोव यांनी त्याच्या आवडत्या कुत्र्याचा सोन्याचा विशाल पुतळा देशात बसविला आहे. राजधानी अश्गाबात येथे या पुतळ्याचे अनावरण त्यांनी केले. अलाबाई जातीच्या कुत्र्याच्या या पुतळ्याची उंची २० फूट असून तो ३० फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसविला गेला आहे. पुतळा कांस्य धातूचा असून त्यावर चोवीस कॅरेट सोन्याचा पत्रा लावला गेला आहे.

जनता गरिबीत आयुष्य कंठत असताना या देशाच्या राष्ट्रपतीची सोन्याचे पुतळे उभे करण्याची हौस भागलेली नाही. यापूर्वी २०१५ मध्ये त्यांनी स्वतःचाच सोन्याचा पुतळा उभा केला आहे. गुरबांगुली बेर्डेमुखमेदोव यांनी २००७ मध्ये देशाची सत्ता मिळविली होती. त्यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यानाही अलाबाई जातीच्या कुत्र्याचे एक पिलू भेट दिले होते.

या जातीची कुत्री तुर्कमेनिस्तान मध्ये आढळतात आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. हे कुत्रे विजयाचे प्रतिक मानले जाते. नैसर्गिक वायू आणि तेलामुळे या देशाला श्रीमंती आली असली तरी काही ठराविक लोकांकडे त्याची सूत्रे आहेत त्यामुळे बाकी जनता गरीब राहिली आहे. या देशातून लाखो नागरिक पलायन करून अन्य देशांच्या आश्रयास जात आहेत कारण जनतेच्या स्वातंत्र्यावर खुपच मर्यादा आहेत असे सांगितले जाते.