छप्पर फाडके घुसलेल्या उल्कापिंडाने केले मालामाल

फोटो साभार काबुल ब्लॉग

उपरवाला देता है तो छप्पर फाडके देता है अशी एक हिंदी म्हण आहे. याचा प्रत्यय इंडोनेशियातील ३३ वर्षीय तरुणाला आला. जोसूआ हुतागलुंग नावाचा इसम ताबूत बनविण्याचे काम करतो. त्याची आर्थिक परिस्थिती बेतासबात होती. पण अचानक त्याला प्रचंड मोठा धनलाभ एका दगडाने करून दिला तेही त्याला अजिबात कल्पना नसताना.

झाले असे की जोसूआ घराबाहेर त्याचे काम करत होता तेव्हा अचानक जोरदार आवाज होऊन एक वस्तू त्याच्या घराचे छप्पर फाडून घरातील जमिनीत वेगाने घुसल्याचे त्याला दिसले. त्याने आत जाऊन जमिनीत घुसलेली वस्तू बाहेर काढली तर तो एक दगड होता. पण हा सामान्य दगड नव्हता तर ती होती साडेचार अब्ज वर्षे जुनी एक उल्का. जमिनीतून त्याने जेव्हा ही उल्का खणून बाहेर काढली तेव्हाही ती गरम होती.

उल्का पडताना झालेला आवाज इतका मोठा होता की आसपासच्या घरातून लोक कसला आवाज आला हे पाहायला आले. जोसूआला हा दगड आकाशातूनच पडला याची खात्री होती. सुमारे दोन किलो वजनाच्या या दगडाबद्दल त्याला १० कोटी रुपये दिले गेले. मिळालेल्या माहितीनुसार ही उल्का इतकी प्राचीन आहे की तिच्या प्रत्येक १ ग्राम तुकड्याची किंमत ८५७ डॉलर्स आहे. जोसूआ सांगतो तीस वर्षे काम करून त्याला जितका पैसा मिळाला नसता तेवढा या एका दगडामुळे मिळाला. त्याने या रकमेतून एक चर्च बांधायचे ठरविले आहे. आपल्या घरात एक मुलगी जन्माला यावी अशीही त्याची इच्छा होती आणि ही उल्का म्हणजे त्याचा संकेत असावा असेही त्याला वाटते आहे.