कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला क्रिकेटची एन्ट्री

फोटो साभार रिपब्लिक वर्ल्ड

क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी अशी की २०२२ मध्ये इंग्लंडच्या बर्मिघम मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आणि आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल)ने या संदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळे २०२२ च्या या स्पर्धात महिला क्रिकेटच्या आठ टीम सहभागी होऊ शकणार आहेत.

ही स्पर्धा इंग्लंड मध्येच होत असल्याने इंग्लंड महिला क्रिकेट टीम सरळ क्वालिफाय होणार आहे आणि या स्पर्धेत सामील होणारी ती पहिली टीम ठरेल. बाकी योग्य टीमसाठी महिला टी२० रँकिंग पाहिले जाणार आहे. एप्रिल २०२१ पासून हे रँकिंग ग्राह्य धरले जाणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. इंग्लंडच्या अॅजबेस्टन मध्ये हे सर्व सामने होणार आहेत.

१९९८ मध्ये प्रथमच कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश केला गेला होता आणि क्वालालंपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत पुरुष क्रिकेट टीम सहभागी झाल्या होत्या. ब्रिटन मधील स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात होणार असून दर चार वर्षांनी एकदा या स्पर्धा आयोजित केल्या जातात. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची ही दुसरी वेळ आहे. महिला टीम इंडिया सध्या रँकिंग मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु सहानी म्हणाले महिला क्रिकेट जगात लोकप्रिय होत आहे याचा हा पुरावा म्हणता येईल.

महिला टीम इंडियाची कप्तान हरमनप्रीत कौर हिने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये क्रिकेट खेळण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून आमची टीम चांगली कामगिरी बजावेल असा विश्वास व्यक्त केला आहे.