करोनाच्या भीतीवर मात करून काशीमध्ये नागनथैया लीला संपन्न

फोटो साभार नवभारत टाईम्स

भोलेनाथाची नगरी वाराणसी येथे बुधवारी करोनाच्या भीतीवर मात करून प्रचंड संख्येने जमलेल्या भाविकांनी नागनथैया लिला या ४५० वर्षे जुन्या परंपरेचा आनंद लुटला. बुधवारी तुलसी घाटावर गर्दीचा पूर लोटला होता मात्र करोना नियमाचे पालन करून हा उत्सव साजरा केला गेला. केवळ पाच मिनिटे चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी दुपारपासून प्रेक्षकांनी घाटावर गर्दी केली होती. काशी राजपरिवाराचे प्रमुख अनंत नारायण सिंह हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

वाराणसीच्या लक्खा मेळ्यात विश्वप्रसिध्द कृष्णलीला साजरी केली जाते. गेली साडेचारशे वर्षे ही परंपरा आहे. या दिवशी गंगा नदी यमुना नदी बनते आणि यमुना बनलेल्या गंगेत कृष्ण कालिया मर्दन करतो अशी ही प्रथा आहे. कृष्ण नदीतून कालीयाच्या फण्यावर उभा राहून पाण्याबाहेर येतो आणि बासरी वाजवितो. पाच मिनिटांच्या या कार्यक्रमासाठी लाखो भाविक येथे जमतात.

गोस्वामी तुलसीदास आखाडा महंत डॉ.विश्वंभरनाथ मिश्र या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले, द्वापार युगात कृष्णाने यमुनेत येऊन राहिलेल्या कालिया नागाचे मर्दन करून यमुनेची कालियाच्या विषातून म्हणजे प्रदूषणातून मुक्तता केली होती. कलीयुगात या लीलेच्या माध्यमातून गंगा प्रदूषणमुक्त करण्याचा संदेश दिला जातो.