साधुसंताना न्याय देण्याची क्षमता ठाकरे सरकारकडे नाही: राणे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्ता हस्तगत केली आहे. शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिलेली नाही. साधुसंताना न्याय देण्याची क्षमता ठाकरे सरकारमध्ये नाही आणि न्याय मिळावा अशी त्यांची इच्छाही नाही, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीका केली. पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, या मागणीसाठी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश यात्रा आयोजित केली होती. मात्र, यात्रा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच नारायण राणे व आमदार निलेश राणे यांनी पोलीस ठाण्यात कदम यांची भेट घेतली. त्यानंतर राणे माध्यमांशी बोलत होते. पालघर हत्याकांडातील आरोपींवर राज्य सरकार काहीही कारवाई करू शकलेले नाही. त्यामुळे कदम यांची सीबीआय तपासाची मागणी योग्यच आहे. राज्य सरकारची साधू संतांना न्याय देण्याची क्षमताही नाही आणि इच्छाही नाही, असे राणे म्हणाले. भाजपाची साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली, तेव्हाच त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला हे स्पष्ट झाले आहे. मग त्यांच्याकडून साधुसंताना न्याय मिळण्याची अपेक्षा कशी करणार, असा सवालही त्यांनी केला. परीक्षाच नाही तर प्रमाणपत्र कसले? आपल्याला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र कोणी देण्याची गरज नाही, अशी शिवसेनेची भूमिका असल्याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः कुठल्याच परीक्षेला बसत नाहीत. पासही होत नाहीत. मग त्यांना प्रमाणपत्र कोण देणार? मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन एक वर्ष होत आले तरी आजपर्यंत त्यांनी राज्यासाठी काहीही केले नाही. केवळ घराच्या पिंजऱ्यात बसून राहतात, अशी टीकाही त्यांनी केली.