संयुक्त महाराष्ट्र: येडीयुरप्पा अजित पवारांच्या विधानावर नाराज

बंगळुरू: बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र साकारण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकारण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करण्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करताना अजित पवार यांनी बाळासाहेबांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले होते. मात्र, या विधानावरून येडीयुरप्पा यांच्यासह कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या विधानाची आपण निंदा करतो. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाबाबत नियुक्त करण्यात आलेल्या महाजन समितीने काय अहवाल दिला आहे, हे सगळ्या जगासमोर स्पष्ट आहे. असे असताना अशा पद्धतीची घोषणाबाजी करणे अयोग्य आहे, असे येडीयुरप्पा म्हणाले. महाजन समितीने बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचे निर्विवादपणे नमूद केले आहे, असा दावा सावदी यांनी केला. कर्नाटकाची नाराजी पवार यांना पत्राद्वारे कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.