म्हणून ट्रम्प यांना सोडायचे नाही राष्ट्रपतीपद

फोटो साभार अॅॅटलांटिक

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाली आणि माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प याना हार पत्करावी लागली असली तरी डोनल्ड कोणत्याही परिस्थितीत खुर्ची सोडावयास तयार नसल्याचा अनुभव येत आहे. त्यासाठी त्यांनी बायडेन यांनी मतमोजणीत गोंधळ केल्याचे आरोप सातत्याने केले असून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची कृती केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी करण्यास नकार देण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यातील काही अशी-

राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यावर ट्रम्प यांना अनेक कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. राष्ट्रपतीपदावर असताना त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत मात्र आजी राष्ट्रपतीविरुध्द गुन्हेगारी केस अमेरिकेत कायद्यानुसार चालविता येत नाही. यात पैसे अफरातफरी बरोबर पोर्न स्टार पर्यंत अनेक आरोपांचा समावेश आहे.

स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून संपत्तीच्या किमती वाढवून घेणे, कर्जे मान्य करून घेणे, कर चोरी असे अनेक आरोप ट्रम्प यांच्यावर आहेत. शिवाय दोन महिलांनी त्यांच्या विरोधात लैगिक शोषण केल्याचे दावे दाखल केले आहेत. ट्रम्प यांच्या नातेवाईक मेरी ट्रम्प यांनी त्यांच्या पुस्तकात कौटुंबिक व्यवसायात डोनल्ड यांनी फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत.

ट्रम्प यांनी सत्तेचा वापर करून अनेक विदेशी, स्वदेशी अधिकाऱ्यांना स्वतःच्या हॉटेल मध्ये उतरवून सरकार कडून त्यापोटी ६ लाख डॉलर्स म्हणजे ४४६ लाख रुपये वसूल केले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार ट्रम्प यांच्यावर ४० कोटी डॉलर्स म्हणजे २९८० कोटी रुपये कर्ज असून दिवाळखोरी वाचविण्यासाठी ते विदेशनीतीच्या मदतीने जगभर स्वतःसाठी आणि कुटुंबांसाठी पैसा जमा करत आहेत. इतकेच नव्हे तर निवडणुकीत गडबड झाल्याविरोधात केस लढण्यासाठी सुद्धा ते समर्थकांकडून देणग्या घेत असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रपतीपद सोडल्यावर त्यांना त्यांच्या उत्पन्नाचे सर्व तपशील, त्यापोटी भरलेला कर याची माहिती सार्वजनिक करावी लागणार आहे. त्यातून कोणत्या परदेशी कंपन्यातून ट्रम्प यांनी कसे आणि किती पैसे मिळविले हे उघड होण्याची भीती आहे. शिवाय ट्रम्प याना पराभव आवडत नाही आणि तो त्याच्या घराण्याचाच गुण असल्याचेही सांगितले जात आहे.