मुंबईत समुद्राकाठी, नदी काठी छट पूजेस बंदी

फोटो साभार अमर उजाला

मुंबई महापालिकेने म्हणजे बीएमसीने समुद्राकाठी, नद्या किंवा नैसर्गिक सरोवराकाठी छट पूजा करण्यास बंदी घातली आहे. मात्र सामाजिक संस्थांनी खासगी कृत्रिम तलाव उभारले तर तेथे पूजा करण्याची परवानगी दिली आहे. बीएमसीने या प्रकरणी मुंबई पोलिसांचे सहकार्य मागितले असून लोकांना एकत्र गर्दी करू देऊ नये अश्या सूचना दिल्या आहेत. अर्थात कृत्रिम तलावावर पूजेसाठी सुद्धा नियमावली जारी केली गेली आहे.

दरवर्षी छट पूजेसाठी मुंबईच्या जुहू बीचवर लाखोंच्या संखेने भाविक एकत्र येतात. यंदा करोनाचे संकट असल्याने संक्रमण वाढू नये यासाठी बंदी केली गेली आहे. हा उत्सव शुक्रवार आणि शनिवारी साजरा होत आहे. ज्या ठिकाणी कृत्रिम तलावांवर पूजा केली जाईल तेथे एक वैद्यकीय टीम तैनात केली जाणार आहे आणि गरज पडल्यास तेथेच संशयित लोकांची करोना चाचणी केली जाणार आहे.

छटमातेचा हा उत्सव म्हणजे सूर्यपूजेचा उत्सव आहे. छट माता ही सूर्याची बहिण मानली गेली असून ती मुलाबाळांचे रक्षण करणारी आहे असा समज आहे. मार्कंडेय पुराणानुसार निसर्गाने स्वतःला सहा भागात विभागले आहे. त्यातील सहावा भाग मातृदेवी रूप आहे. ही ब्रह्माची मानस कन्या आहे. दुर्गेचे सहावे रूप कात्यायनी हीच छट मैया असल्याचे सांगितले जाते. बिहार मध्ये या सणाचे विशेष महत्व असून सीता, कुंती, द्रौपदी यांनीही हे व्रत केल्याचे उल्लेख येतात. घरातील मुलांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत केले जाते.