‘मराठा बोर्डा’विरुद्ध बंद केल्यास कडक कारवाई करणार: येडीयुरप्पा

नवी दिल्ली: कर्नाटकात मराठी भाषिकांच्या हितरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मराठा बोर्डा’विरुद्ध बंद पुकारण्यास परवानगी देण्यात येणार नाही आणि जबरदस्तीने बंद पुकारल्यास कन्नड समर्थकांवर कडक कारवाई करू, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी दिला.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्नाटकात राहणारे मराठी भाषिकही राज्याचे नागरिक आहेत. त्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठीच आपल्या सरकारने मराठा बोर्ड स्थापन केले आहे. या निर्णयाविरोधात जबरदस्तीने बंद पुकारल्यास कडक कारवाई करू, असा इशारा येडीयुरप्पा यांनी दिला.

बेळगाव लोकसभा आणि बसवकल्याण, मस्की या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांची काळजी घेणारे बोर्ड स्थापन केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या तिन्ही मतदारसंघात मराठी भाषिकांचे प्राबल्य आहे.