‘… त्यामुळे साधेल बिहारचा विकास आणि महाराष्ट्रात नांदेल शांतता’

मुंबई: बिहारमध्ये विकास साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य घ्यावे. त्यामुळे बिहारचा विकासही होईल आणि महाराष्ट्रातही शांतता नांदेल, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून भाजप; विशेषतः बिहार निवडणुकीतील पक्षाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लागण्यात आला आहे. भाजपने पुढील चार वर्ष बिहारमधील विजयाचा आनंद साजरा करावा, असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.

बिहारमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भाजपकडून बिहारमधील सरकार निर्विघ्नपणे कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगितलेजाते. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर असून ते केव्हाही कोसळेल, असा दावा केला जातो. हा त्यांचा ढोंगीपणा आहे. बिहारमध्ये रालोआकडे केवळ ३ ते ४ आमदारांचे बहुमत आहे तर महाराष्ट्रात महाआघाडीकडे ३० आमदारांचे बहुमत आहे याची जाणीव ठेवावी, असेही या लेखात सुनावण्यात आले आहे.

कोणाच्याही जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना देण्यात येईल, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. तो पाळला हे ठीकच आहे मात्र, ही व्यवस्था कार्याला पूर्ण होईपर्यंत पाळली जाणार का, असा सवाल करतानाच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात शब्द न पाळल्यामुळे वर्षभरापूर्वी झालेल्या ‘पचक्या’चे दुःख विसरण्यासाठीच महाराष्ट्रातील भाजप नेते बिहारमध्ये रमत असल्याची कडवट टीकाही ‘सामना’मधून करण्यात आली आहे.