ट्विटरने हॅकरला बनविले सुरक्षा प्रमुख

फोटो साभार क्रिप्टोनॉमिक्स

गेले काही महिने ट्विटर अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यात सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे ती हाय प्रोफाईल युजर्सची अकौंट हॅक होण्याची. अशी महत्वाची अकौंट हॅक होण्यापासून कशी थांबवावी याचे उत्तर ट्विटरला मिळालेले नाही. परिणामी त्यांनी एका नावाजलेल्या हॅकरलाच कंपनीचा सुरक्षा प्रमुख किंवा सिक्युरिटी हेड म्हणून नियुक्त केले आहे. या प्रसिद्ध हॅकरचे नाव पिटर जात्को असे असून तो मुगे (Mudge) या नावानेही ओळखला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार पिटर नावाजलेला हॅकर आहे आणि जगभरात त्याची हीच ओळख आहे. ट्विटर मधील त्याच्या नियुक्तीने तो खुपच आनंदात आहे. पिटर थेट ट्विटर सीईओ जॅक डोर्सी यालाच रिपोर्ट करणार आहे. पिटरकडे डिफेन्स अॅडव्हांस रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी, सीडीसी कम्युनिकेशन्स येथे कामाचा अनुभव आहे. गेल्या काही महिन्यात ट्विटरवर जो बायडेन, जेफ बेजोस, बिल गेट्स, अॅलन मस्क अश्या अनेक धुरीणांची अकौंटस हॅक केली गेली आहेत आणि त्यामुळे ट्विटर युजर्स बरोबरच कंपनी या संकटातून कसे बाहेर पडायचे आणि अकौंट सुरक्षेची हमी कशी द्यायची यासाठी प्रयत्न करत आहे असे समजते.