काहीतरी नवे घेऊन ‘मी पुन्हा येईन’: अमृता फडणवीस

मुंबई: गायिका, उच्चपदस्थ बँकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे भाऊबीजेच्या दिवशी नेटवर रिलीज झाल्यानंतर दोनच दिवसात त्याला तब्बल १० लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रतिसादाबद्दल त्यांनी नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत आणि त्यांना ‘मी पुन्हा येईन’ असे सूचक आश्वासनही दिले आहे. ते देखील काही तरी नवे घेऊन, हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.


अमृता यांनी नारीशक्तीला अर्पण केलेले हे गाणे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केल्यावर अल्पावधीतच ते लोकप्रिय ठरले. अर्थातच सुमारे १८ हजार जणांनी त्याला नापासांतही केले आहे. तरीही ‘तिला जगू द्या’ या त्यांच्या गाण्याला प्रतिसाद दिल्याबद्दल अमृता यांनी रसिकांचे आभार मानले आहेत. आपण या गाण्याच्या कौतुकाबद्दल आणि टिकेबद्दलही व्यक्त होणाऱ्यांचे आभार मानतो. रसिकांसाठी काही नवे घेऊन आपण पुन्हा येऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.