कारपेक्षा महाग नंबरप्लेट

फोटो साभार अमर उजाला

अलिशान लग्झरी कार्स खरेदीचा शौक आपण समजू शकतो. पण एखादी लग्झरी स्पोर्ट्स कार ज्या किमतीत येईल इतकी किंमत गाडीच्या नंबरप्लेट साठी मोजल्याची बातमी काही वारंवार वाचायला मिळत नाही. १९०२ मधली एक दुर्लभ नंबरप्लेट युके मध्ये चक्क १२८,८०० पौंड म्हणजे तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांना विकली गेली आहे. या नंबर प्लेटचे वैशिष्ट एक आकडा किंवा एक प्लेट इतकेच नाही तर तिला काही दशकांचा इतिहास जोडला गेलेला आहे.

सर्वप्रथम म्हणजे १९०२ साली ही नंबरप्लेट बर्मिघम मधील एका व्यक्तीसाठी जारी केली गेली होती. त्याचे नाव चार्ल्स थॉंम्पसन. त्या काळात मुळात वाहनेच दुर्लभ होती मग नंबरप्लेट दुर्लभ असणारच. ज्या वाहनावर ही नंबरप्लेट होती ते सहज ओळखता येत असे. १९५५ मध्ये चार्ल्सचे निधन झाले तेव्हा ही नंबरप्लेट बॅरी थॉंम्पसनकडे गेली व २०१७ पर्यंत त्याच्याचकडे होती. त्याने ही नंबरप्लेट सिरीज जग्वार, ऑस्टिन ३५ एस, मिनी व फोर्ड कोर्टिना सारख्या कार्ससाठी वापरली.

या प्लेटचा सिल्व्हरस्टोन तर्फे लिलाव करण्यात आला. तेव्हा तिला वरील किंमत मिळाली. अर्थात खरेदीदाराचे नाव गुप्त ठेवले गेले आहे. ग्राहकाचे नाव अज्ञात ठेवण्यामागाचे कारण दिले गेलेले नाही. त्यामुळे ही नंबरप्लेट कुणी खरेदी केली याविषयी उत्सुकता वाढली आहे.