कबुतरासाठी लागली १३ कोटी ४० लाखाची बोली, बनले रेकॉर्ड

फोटो साभार अमर उजाला

कबुतरांच्या स्पर्धा होतात आणि या स्पर्धा अनेक देशात खूप लोकप्रिय आहेत ही माहिती नवी नाही. मात्र या रेससाठी खरेदी केलेल्या कबुतरांसाठी किती किंमत मोजण्याची तयारी असते ही मात्र नवलाची गोष्ट आहे. बेल्जियम येथे नुकत्याच झालेल्या रेस कबुतरांच्या लिलावात एका कबुतराला चक्क १३ कोटी ४० लाख रुपये बोली लागली. एका चीनी माणसाने या कबुतरासाठी ही बोली लावली. विशेष म्हणजे त्याला स्पर्धा दुसऱ्या चीनी माणसाचीच होती. या कबुतराचे नाव ‘ न्यू किम ‘ असे आहे. त्याने त्याच्या किमतीत लग्झरी कार्सना सुद्धा मागे टाकले आहे.

हे कबुतर ३ वर्षांचे आहे. पिजन पॅराडाइज तर्फे हे कबुतर लिलावात ठेवले गेले होते. पिजन पॅराडाइजचे चेअरमन निकोलस म्हणाले या कबुतराला मिळालेली किंमत हे जागतिक रेकॉर्ड आहे. अर्थात लिलावात कबुतरांना मिळालेल्या किमती अधिकृत पणे कागदोपत्री नोंदविल्या जात नाहीत. या कबुतराने २०१८ मध्ये फ्रांस मध्ये झालेली स्पर्धा जिंकली आहे.

चीन देशात कबुतर रेस ही परंपरा आहे. मिंग राजवंशात म्हणजे १३६८ पासून ते १६४४ पर्यंत कबुतर रेस हा लोकप्रिय खेळ होता. आजही चीनमध्ये या स्पर्धा अतिशय लोकप्रिय आहेत. खाडी देश आणि आशियाई देशातील करोडपती या स्पर्धातून सहभागी होतात. त्यासाठी कबुतरे लिलावातून खरेदी केली जातात. बेल्जियम व उत्तर फ्रांस मध्ये दीर्घकाळ कबुतरे पाळली जात आहेत. यापूर्वी ‘लुईस हेमिल्टन ‘ नावाचे कबुतर ११ कोटी रूपयांना लिलावात विकले गेले होते. न्यू किम या कबुतराने हे रेकॉर्ड तोडले आहे.