आयफोन १२ मिनीचे युजर्स वैतागले

अॅपलने २०२० मध्ये सादर केलेल्या आयफोन १२ सिरीज मधील खास, पाहिला स्वस्त ५ जी आयफोन १२ मिनी बाजारात दाखल झाला आहे. मात्र उत्सुकतेने या फोनची खरेदी केलेले युजर्स फोनमुळे त्रासले आहेत असे दिसते. अॅपल सपोर्ट फोरमवर या संदर्भात युजर्स त्यांचा अनुभव शेअर करत आहेत. त्यानुसार लॉक स्क्रीनमुळे युजर्स त्रासले असून फोन लॉक झाला की तो अनलॉक होण्यात अडचणी येत आहेत.

युजर्सच्या म्हणण्यानुसार लॉक स्क्रीन स्वाईप अप करून किंवा कॅमेरा अॅप लाँच करून फोन अनलॉक होत नाही. एकदा फोन लॉक झाला की टच रीस्पॉन्स मिळत नाही. या संदर्भात कंपनी कडून अजून तरी कोणताही अधिकृत खुलासा केला गेलेला नाही. मात्र कंपनीने दावा केला होता की आयफोन १२ सिरीजसाठी अन्य उपकरणांच्या तुलनेत चौपट अधिक मजबूत सफायर ग्लास दिली गेली असूनही युजर्स फोन ड्रॉपपासून बचाव होण्यासाठी स्क्रीन गार्डचा वापर करत आहेत.

आयफोन १२ मिनी हा सर्वात छोटा फाईव्ह जी फोन असून त्याला ५.४ इंची डिस्प्ले, ए १४ बायोनिक चीप दिली गेली आहे. या फोनची किंमत ६९९९९ रुपये आहे.