सदाभाऊ खोतांच्या दिलजमाईच्या संकेतांना राजू शेट्टी देणार का सकारात्मक प्रतिसाद ?


मुंबई – केवळ काही मुद्द्यांवरून झालेल्या वादामुळे दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाटत आहे. कारण याबद्दलचे तसे संकेत खुद्द सदाखाऊ खोत यांनी दिले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमची विचारधारा एकच आहे. आमच्यात केवळ काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्याचे खोत म्हणाले. आता राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या दिलजमाईच्या संकेतांना सकारात्मक प्रतिसाद देणार का, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

आमच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काही वाद झाले. काही शेताच्या बांधावरचे आमचे भांडण नाही. आमची शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच भूमिका आहे. आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत केली. तीच मागणी स्वाभिमानीने देखील आहे. आमच्यात चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत आहे. आमचे आणि त्यांचे मत एकच असल्याचे ‘एबीपी माझा’या वृत्तवाहिनीशी बोलताना सदाभाऊ म्हणाले.

खोत यांना यावेळी तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसल्याचे अतिशय सूचक वक्तव्य त्यांनी केले. आमचे काही मुद्द्यांवरून मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्याने आमच्यात दरी निर्माण झाल्याचे खोत पुढे म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून रयत क्रांती संघटना उभारली. भाजपने त्यांच्याशी जवळीक राजू शेट्टींचे राजकारण कमकुवत करण्यासाठी साधली. पण आता जिल्ह्यातील राजकारणात त्यांना डावलले जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत असल्यामुळे भाजपवर खोत नाराज असल्याची माहिती आहे. खोतांनी केंद्राने आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही टीका केली होती.