राज्यातील ‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे आजही भक्तांसाठी बंद


कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील मंदिरे मागील आठ महिन्यापासून बंद होती. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आज प्रतिबंधित क्षेत्रातील मंदिरे सोडून राज्यातील सर्वच मंदिरांची दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास परवानगी दिल्यामुळे अनेक मंदिरे आज भक्तांसाठी उघडण्यात आली. पण अशात राज्यातील काही मंदिरे अजूनही न उघडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. भक्तांना कोरोना काळात दर्शन देण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यासाठी या मंदिरांनी आणखी एक दिवस वेळ घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

आजपासून करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर उघडण्यात येणार नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून अंबाबाईचे मंदिर हे भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत यासाठी रांगेतून दर्शन घेता येणार आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजातून आत जाण्याची आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तर भक्तांना देवीच्या दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची देखील व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हळदी-कुंकू, खण, नारळ, ओटी, फुल आदी देवीला वाहण्यावर बंदी असल्यामुळे कुणीही या वस्तू आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर आज बुलढाण्यातील शेगांवचं गजानन महाराज मंदिरदेखील उघडणार नाही. उद्या 17 नोव्हेंबरला श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी उघडण्यात येणार आहे. आज मंदिर प्रशासनाकडून यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे तर दर्शनासाठी ई-पास घ्यावी लागणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, आजपासून राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी वसई-विरारमधील चर्च आजपासून खुली होणार नाहीत. स्थानिक प्रशासनाचा लेखी आदेश जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत चर्च सर्वसामान्यांसाठी खुली होणार नसल्याचे चर्चकड़ून स्पष्ट करण्यात आले आहे.