मुंबईतील दिवाळीच्या दिवसातील हवा यंदा पुण्यापेक्षाही शुद्ध


मुंबई – दिवाळीच्या दिवसातील मुंबईची हवा यंदा पुण्यापेक्षाही शुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांनी दिवाळीच्या दिवसांत पुणेकरांच्या तुलनेत फटाक्यांपासून होणारे उत्सर्जन कमी केले. सागरी हवेचीही त्याला साथ मिळाली. मुंबईत लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी १०७ मायक्रॉन म्हणजेच ‘मध्यम’ होती. पण ही पातळी पुण्यात ३०२ मायक्रॉन या ‘धोकादायक’ गटात गेली होती. पुण्यातील प्रदूषण नेहमीच्या तुलनेत दुप्पट झाले होते. पण, नेहमीपेक्षा कमी प्रदूषण मुंबईत नोंदविण्यात आले आहे.

शहरातील विविध ठिकाणी दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत ‘सफर’च्या वतीने घेतल्या जातात. दिवाळीच्या दिवसांत प्रामुख्याने लक्ष्मीपूजन आणि त्यानंतरच्या दिवसांतील हवा प्रदूषणाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टिक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण प्रामुख्याने तपासले जाते.

पीएम २.५ ची हवेतील पातळी १ ते ५० मायक्रॉन असल्यास स्थिती उत्तम समजली जाते. ५० ते १०० समाधानकारक, १०० ते २०० मध्यम, २०० ते ३०० अतिशय वाईट स्थिती समजली जाते. ३०० मायक्रॉनच्या पुढील प्रमाण अतिधोकादायक समजले जाते. प्रदूषणकारी कणांची हवेतील पातळी मुंबईमध्ये १४ नोव्हेंबरला (लक्ष्मीपूजन) केवळ ९० मायक्रॉन होती. ती दुसऱ्या दिवशी १०७ मायक्रॉनपर्यंत पोहोचली. १४ नोव्हेंबरला पुण्यात १२७ मायक्रॉन आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच थेट ३०२ मायक्रॉनपर्यंत ही पातळी वाढली. पुण्यातील ही पातळी अतिशय वाईट ते धोकादायक गटातील होती. मुंबईत केवळ चेंबूर भागात प्रदूषित कणांची पातळी (२५७ मायक्रॉन) वाईट गटात होती. यंदा मुंबईत फटाक्यांपासून कमी प्रमाणात उत्सर्जन झाले आणि समुद्रातून या कालावधीत वारेही वाहत असल्याने प्रदूषित कणांचे हवेतील प्रमाण कमी राहू शकल्याचे सफरने स्पष्ट केले आहे.