कोरोनामुळे रद्द होऊ शकतो टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा


सिडनी : तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. 27 नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा हा दौरा सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. कसोटी मालिकेला अॅडलेडपासून सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच या सामन्यावर कोरोनाचे संकट दिसत आहे.

चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना डे-नाइट असणार आहे. या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली पॅटिर्निटी लिव्हसाठी भारतात परतणार आहे. पण कोरोनाचे या कसोटी सामन्यावर सावट आहे. अॅडलेडमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे येथील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कसोटी सामना होणार का नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण ऑस्ट्रेलियामधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. इतर सर्व राज्यांच्या सीमा अॅडलेड प्रशासनाने बंद केल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट येत असल्यामुळे या परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. 17 डिसेंबर रोजी अॅडलेडमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना होणार आहे. पण वेस्‍टर्न ऑस्‍ट्रेलिया, तस्‍मानिया आणि नॉर्दन क्षेत्रातील सरकारने क्‍वींसलॅडसह सीमा बंद केल्या आहेत. यासह 14 दिवसांच्या क्वारंटाइनची सक्ती केली आहे.