ठाकरे पिता-पुत्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या समीत ठक्करचा जामीन मंजूर


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करचा जामीन मंजूर झाला असून समीत ठक्करला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयात समीत ठक्करच्या जामीनासाठी सुनावणी झाली होती. समीत ठक्करच्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर सुनवाणी झाली. मुंबईतील न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यास सर्वोच्च न्यायालयाने ठक्करला सांगितले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळे समीत ठक्करला 24 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. समीत ठक्करची मुंबई सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या हमीवर मुक्तता केली आहे.1 जुलै 2020 ला समीत ठक्कर विरोधात नितीन तिवारी या शिवसेना पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये समीत ठक्करने ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईत समीत ठक्कर विरोधात मुंबईतील धर्मेंद्र मिश्रा यांनी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. बीकेसी सायबर सेलकडे देखील ठक्कर विरोधात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये समीत ठक्करवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.