धार्मिक स्थळे उघडण्याचे श्रेय लाटणाऱ्या भाजपला रोहित पवारांनी सुनावले


मुंबई – राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर अखेर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पण मंदिरे खुली करण्याला कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून परवानगी मिळाल्याने भाविकांसाठी सर्वार्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याच दरम्यान भाजपाला टोला लगावला आहे. भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजपा पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी माझ्यासह इतरांनीही केलेल्या विनंतीनुसार आजपासून ती सुरू झाली असल्याचे देखील म्हटले आहे.


आपल्या कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध मंदिरात जाऊन रोहित पवार यांनी दर्शन घेतले. रोहित यांनी मतदारसंघात पहाटे खर्ड्यात संत सिताराम बाबा व संत गितेबाबा यांच्या समाधीची पूजा करून दर्शन घेतले. जामखेडमधील नागेश्वर मंदिर आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले. तसेच कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु संत श्री. गोदड महाराज, राशीनला जगदंबा देवी आणि सिद्धटेकला गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आणि आरती केली. या परिसरातील व्यवसायानांही धार्मिक स्थळे उघडल्याने चालना मिळेल. पण कुणीही कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करु नये, ही विनंती देखील केली आहे.