बिहार निकालावरून कपिल सिब्बल यांचा आपल्याच पक्षाला घरचा अहेर


नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असे म्हणत पक्षालाच घरचा अहेर दिला आहे. कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.

आता कपिल सिब्बल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की केवळ बिहारच नाही तर देशातील ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. काँग्रेसला गुजरातच्या पोटनिवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तर तीन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. गुजरातमध्येही लोकसभा निवडणुकीत हेच घडले होते. तर काँग्रेसच्या उमेदवारांना उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी दोन टक्के मते मिळाल्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारल्याचे कपिल सिब्बल म्हणाले आहेत.