गुड न्यूज ! सिरमने तयार केलेल्या लसीचे लवकरच 6 कोटी लोकांना मिळणार डोस


पुणे : जगभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारीत होत असलेली घट पाहता आता सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतिक्षा आहे. कोरोना प्रतिबंधक लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्व फार्मा कंपन्या यासाठी जोरदार तयारी करत आहेत. यातच देशातील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी आतापर्यंत 6 कोटी लसीचे डोस तयार केले आहे.

भारतातील कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारी कंपनी सिरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक यांनी आपल्या लसीची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत 6 कोटी डोस सिरम इंस्टिट्युटने तयार केले आहेत, तर भारत बायोटेकनेही आपल्या लसीचे उत्पादन सुरू केले आहे. भारतात कोरोना लस तयार होण्याबरोबरच रशियाची स्पुतनिक -5 ही लसही भारतात दाखल झाली असून त्याचे लवकरच उत्पादन सुरू केले जाऊ शकते.

ज्या वेगाने फार्मा कंपन्या कोरोना प्रतिबंधक लस तयार करत आहेत, ते पाहता लवकरच कोरोनावर मात करू शकणारी लस उपलब्ध होऊ शकते. अनेक कोरोना लस येत्या काही महिन्यांत बाजारात उपलब्ध होऊ शकतात. याबाबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात देशातील 30 कोटी लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात येणार आहे.

आतापर्यंत 155 कोरोना प्रतिबंधक लसींवर जगभरात काम सुरू आहे. यातील 47 लस या अंतिम टप्प्यात असून जगभरातील फार्मा कंपनीमध्ये भारतातील भारत बायोटेक, फायझर, ऑक्सफर्ड आणि स्पूतनिक-5 सारख्या लसींचा समावेश आहे. फायझर ही लस आता 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाला एक डोस द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोस लागणार असल्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे आव्हान मोठे असणार आहे. हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावे लागणार असून तेवढा वेळ लसीकरणासाठी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.