मुख्यमंत्री येडियुरप्पांनी कर्नाटकात केली मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना


बंगळूरु – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी त्यासंदर्भातील आदेश देखील दिले आहे. त्याचबरोबर मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून तो निधी राखीव ठेवण्यात आला आहे. हा निर्णय कर्नाटक राज्यात तसेच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी घेण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

कर्नाटक सरकारच्या अधिकृत आदेशानुसार, कर्नाटक राज्यात गेल्या कित्येक दशकांपासून वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे मराठा विकास प्राधिकरणाचे मुख्य लक्ष्य असणार आहे.

बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्याआधी हा निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतला आहे. मराठा समाजातील मतदारांची संख्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोरोनामुळे काँग्रेस नेते बी. नारायण राव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. बंगळुरुमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अद्याप निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.