अमेरिकाः रस्त्यावर उतरले ट्रम्प समर्थक, पोलिसांशी हिंसक झडप


जगातील सर्वात लोकप्रिय निवडणुकांपैकी एक म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक भलेही संपली असावी, पण डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक हा पराभव पचवू शकलेले नाहीत. याच दरम्यान ट्रम्प यांचे हजारो समर्थक अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या रस्त्यावर उतरले असून घोषणाबाजी करत आहेत. या समर्थकांसह पोलिसांच्या हिंसक चकमकीही घडल्या आहेत.

खरं तर, ट्रम्प यांचे लाखो समर्थक वॉशिंग्टनमध्ये ‘मिलियन MAGA मार्च’मध्ये सहभाग घेण्यासाठी दाखल झाले. ट्रम्प समर्थकांचे म्हणणे आहे की पेनसिल्व्हेनिया, नेवाडा यासारख्या ठिकाणी काहीतरी गडबड झाली आहे. त्यांचा आरोप आहे की निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाली आहे आणि लोकमतावर डल्ला मारला गेला आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, यावेळी डोनाल्ड ट्रम्प समर्थक आणि विरोधक यांच्यात जोरदार झटापट झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. या घटनेबद्दल ट्रम्प यांनी वॉशिंग्टनचे महापौर आणि डाव्या संघटना ANTIFAवर निशाणा साधला आहे.

यापूर्वी अध्यक्ष ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो लोक वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. ट्रम्प समर्थकांचे म्हणणे आहे की जेव्हा सर्व राज्यांमध्ये मतपत्रिकांची पुन्हा मोजणी केली जाईल, तेव्हाच त्यांचे समाधान होईल. अनेक ठिकाणी मृतांच्या नावे मते टाकण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार ट्रम्प-विरोधी संस्था अँटिफा, ब्लॅक लाइव्ह्स मॅटर आणि ट्रम्प समर्थक प्राऊड बॉयज यांच्यात संघर्ष झाला. वॉशिंग्टनमध्ये अंधार पसरताच ट्रम्प आंदोलक अधिकाधिक संतापले.
सध्या वॉशिंग्टन डीसीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हाइट हाऊसची सुरक्षा आधीपासूनच कडक आहे. ट्रम्प यांचे विश्वासू मंत्री माईक पोम्पीओ आधीच म्हणाले आहेत की अध्यक्ष ट्रम्प त्यांच्या पुढच्या कार्यकाळाची तयारी करत आहेत.