सणाच्यावेळी ज्ञान द्यायचे बंद करा, विराट कोहलीच्या व्हिडीओ मेसेजवर भडकले नेटकरी


नवी दिल्ली – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शुभेच्छा देत एक व्हिडीओ भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पोस्ट केला आहे. पण सोशल मीडियावर विराट आणि अनुष्कावर या व्हिडीओमुळे ट्रोल होण्याची वेळ आली आहे. विराटला या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केले तर त्याच्या चाहत्यांनी त्याची पाठराखण केली आहे.

थेट ऑस्ट्रेलियामधून आपल्या चाहत्यांना विराटने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली १८ सेकंदाच्या या व्हिडीओत म्हणत आहे की, तुमच्या आयुष्यात हा सण आनंद, भरभराट आणि समाधान घेऊन येवो. लक्षात ठेवा फटाके फोडू नका, निसर्गाचे संरक्षण करणे ही देखील आपली जबाबदारी आहे. साधारण दिवे आणि मिठाईसह कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करा. देव तुमचे कल्याण करो! स्वत:ची काळजी घ्या!


विराटच्या या व्हिडीओनंतर नेटकरी आणि चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. विराटला ट्रोल करण्याचा नेटकऱ्यांनी प्रयत्न केला, पण त्याचे चाहते त्याची पाठराखण करताना दिसत आहेत. दिवाळीनिमित्त विराट कोहलीने दिलेला मेसेज अनेकांना आवडला नाही. विराट कोहलीला ट्रोल केले जाते असल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर #IStandWithVirat ही मोहिम राबवली आहे. दुसरीकडे #अनुष्का_अपना_कुत्ता_संभाल आणि अनुष्का असे दोन ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरु आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडिओ मेसेजनंतर विराट कोहली- अनुष्का यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.

दिवाळीनिमित्त विराट कोहलीने दिलेला संदेश काही नवीन नाही. पर्यावरण आणि स्वास्थ व्यवस्थित राहावे, त्यामुळे देशात आणि अनेक राज्यांमध्ये फटाक्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या राज्यांना सूट मिळाली आहे तिथेही नियम आणि अटी लागू आहेत. पण आपली नाराजी व्यक्त करत ट्विटरवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी वाढदिवसाला फटाके फोडले, तेव्हा कुठे गेला होता हा मेसेज असा प्रश्न काहींनी विराट कोहलीला विचारला आहे.

एका युझर्सने म्हटले आहे की, आमच्या सणाच्यावेळी तुझे ज्ञान द्यायचे काम बंद करा, आमचे सण म्हणजे तुमचे समाज जागृती मोहिम नाही. त्याचबरोबर दुसऱ्या अन्य एक युजर लिहितो की, तुम्ही क्रिकेट खेळता, आम्ही तुम्हाला प्रेम करतो. पण तुम्ही सामाजिक, धार्मिक किंवा हिंदूंचा सल्लागार होण्याची चूक कधी करु नका.