पुणेकरांकडून कोरोनाच्या नियमांना केराची टोपली, अनिश्चित कालावधीसाठी सारसबाग बंद


पुणे : पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने सारसबाग कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याने अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शहरातील इतर उद्यानांमध्येही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास ती उद्यानेही बंद करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे नागरिक उल्लंघन करत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या सात महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली पुणे शहरातील उद्याने 1 नोव्हेंबरपासून खुली करण्यात आली होती. महानगरपालिकेची 200 पेक्षा अधिक उद्याने पुणे शहरात आहेत. राज्यातील इतर शहरांमधील उद्याने अद्यापही बंद आहेत. पण 1 नोव्हेंबरपासून पुणे महापालिकेने 81 उद्याने खुली केली होती.

पण उद्याने खुली झाल्यानंतर नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. दहा वर्षांखालील मुले, 65 पेक्षा अधिक वय असणारे नागरिक, गर्भवती महिला, अन्य आजार असलेल्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर उद्याने सुरु करताना निर्बंध घालण्यात आले होते. लाफ्टर क्लब, योगा, दिवाळी पहाट कार्यक्रम यांनाही बंदी घालण्यात आली होती. तसेच उद्यानात येणाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. याउलट, उद्यानांमध्ये दहा वर्षांखालील मुले, 65 पेक्षा अधिक वय असणारे नागरिकही उद्यानांमध्ये येत असल्याचे निदर्शनास आले.

त्याचबरोबर उद्यानांमधील व्यायामाचे साहित्यही वापरले जात असून उद्यानांमध्ये येणारे अनेक नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने 14 नोव्हेंबरपासून सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात राज्य सरकारने लॉकडाऊन 5 च्या नियमावलीत सूट दिली असताना पुण्यातील 199 पैकी 150 उद्याने सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण पहिल्या काही दिवसांतच नागरिकांनी घालून दिलेले नियम न पाळल्याने महापालिकेने उद्याने पुन्हा एकदा बंद करावी लागली होती.