संपूर्ण हिंदुस्थानात ‘एमआयएम’ फडकवणार आपला झेंडा – अकबरुद्दीन ओवेसी


नवी दिल्ली – नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाले असून या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएनने बहुमत मिळवले. पण याच निवडणुकीत खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने मुसंडी घेत पाच जागांवर विजय मिळवल्यामुळे एमआयएमचा आत्मविश्वास आता कमालीचा वाढल्याचे दिसत आहे. त्यातच हा आत्मविश्वास वाढल्याचे एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे.

एमआयएमला बिहारमधील निवडणुकीत मिळालेले यश हिंदुस्थानच्या राजकारणात एक नवी तारीख लिहील. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) संपूर्ण हिंदुस्थानात आपला झेंडा फडकवत असल्याचे जग पाहील, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बिहारच्या निकालानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. आम्ही बिहारमध्ये पाच वर्षांपूर्वी सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी आमच्या पाच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. सहाच्या सहा जागांवर आमच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. तरी देखील आम्ही खुप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिले. आम्हाला जनतेने मतदान केले आणि प्रेम दिले. यापुढे अजूनही आम्हाला मेहनत करायची असल्याचे ओवेसी म्हणाले होते.