कोरोनाचे नियम मोडल्याचा इवांका ट्रम्प यांच्या मुलांना फटका; सोडावी लागली शाळा


वॉशिंग्टन – अमेरिकेसारखा प्रगत देशानेही कोरोना संकटापुढे गुडघे टेकले आहेत. संपूर्ण जगात अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असून तेथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतील शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांना देखील कोरोना नियमांचे पालन न केल्याचा फटका बसला आहे. ज्यामुळे आपल्या तिन्ही मुलांना इवांका ट्रम्प आणि त्यांचे पती जेरेड कुश्नर यांना दुसऱ्या शाळेत दाखल करावे लागले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून वॉशिंग्टनमधील एका शाळेत इवांका ट्रम्प यांची तिन्ही मुले शिक्षण घेत होते. अनेकदा पालकांसाठी जारी करण्यात आलेल्या कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे इवांका आणि त्यांचे पती जेरेड यांनी उल्लंघन केल्याची माहिती शाळाच्या व्यवस्थापनाने दिली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, शाळेच्या पॅरेंट्स हँडबुकमध्ये नमूद केलेल्या कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी इवांका ट्रम्प आणि त्यांच्या पतीने नियमांचे पालन केलेले नाही. मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टेंसिंगचा पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण त्याचे पालन त्यांनी केले नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केली होती. पालकांसाठी असलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्वांचे इवांका आणि जेरेड हे उल्लंघन करत असल्याचे पालकांनी म्हटल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने इवांका आणि जेरेड यांना नियमांचे पालन करण्यास सांगितले. पण त्यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे शाळा व्यवस्थापनाला देखील चिंता होती.

संपूर्ण ट्रम्प कुटुंबीय अमेरिका राष्ट्राध्यक्ष वादविवादात उपस्थित होते. इवांका यांनी त्यावेळीदेखील मास्कचा वापर केला नव्हता. तसेच ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही इवांकाने स्वत:ला क्वारंटाईन केले नसल्याची तक्रार पालकांनी केली होती.